आपत्तीग्रस्तांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन
पाचोरा/जळगाव प्रतिनिधी दि.२२ सप्टेंबर :
हिवरा नदीला पूर – शहरात पाणी शिरले

रविवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे हिवरा नदीला पूर आला. परिणामी शहरासह परिसरातील अनेक भागांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. घरांमध्ये, दुकानांमध्ये तसेच शेतपिकांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
पालकमंत्र्यांची आपत्तीग्रस्त भागाची पाहणी
सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांची भेट घेतली. त्यांच्या सोबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि आमदार किशोर पाटीलही उपस्थित होते. मंत्र्यांनी नागरिकांना धीर देत तातडीच्या मदतीचे आश्वासन दिले.
पंचनाम्याचे आदेश – मदतीची ग्वाही

पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून अहवाल प्राप्त होताच मदत दिली जाईल असे स्पष्ट केले.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन म्हणाले की, शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि एनडीआरएफच्या निकषांनुसार सर्वतोपरी मदत दिली जाईल.
‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी
आमदार किशोर पाटील यांनी प्रचंड नुकसानीचा दाखला देत संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
गावागावात पूरसदृश्य परिस्थिती
शहरातील जनता वसाहत, बहिरम नगरसह अनेक भागांत पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. तर खडकदेवळा, गाळण, नाचनखेडा गावांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
प्रशासन व एसडीआरएफकडून बचावकार्य
नगर परिषद, स्थानिक प्रशासन व एसडीआरएफ पथकाच्या मदतीने बाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
