पाळधी :
डोळा म्हणजे माणसाच्या आयुष्यातील सर्वात अनमोल दान. दिसणं म्हणजे जगणं! याच भावनेतून पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला जबरदस्त प्रतिसाद लाभला.पहाटेचा सूर्य उगवायच्या आधीपासूनच गावकरी शिबिर स्थळी जमू लागले. सकाळी ६ वाजताच रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. आपल्या डोळ्यात पुन्हा एकदा उजेड फुलावा, जग अधिक स्पष्ट दिसावं यासाठी शेकडो नागरिकांनी उत्साहाने नोंदणी केली. या शिबिराला संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील रुग्ण येत असतात आज तर पुणे व धुळे येथून रुग्ण आले होते.
शिबिरात तब्बल ५१० रुग्णांची नोंदणी झाली. त्यापैकी तपासणीनंतर २१० रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे रवाना करण्यात आले. आपल्या डोळ्यात नव्याने उजेड फुलणार या आशेने हे रुग्ण आनंदाश्रू डोळ्यात साठवून प्रवासाला निघाले.या शिबिरासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, उद्योजक विक्रम पाटील, जिपीएस परिवार चे सदस्य, कार्यकर्ते, वैद्यकीय तज्ञ व स्थानिक पदाधिकारी यांनी दिवस रात्र मेहनत घेतली. ग्रामस्थांनी भावनिक प्रतिसाद देत “आमच्या डोळ्यातील अंधार दूर करण्यासाठी घेतलेली ही मेहनत कधीही विसरणार नाही” अशा शब्दांत आभार मानले.
हा उपक्रम केवळ आरोग्य शिबिर ठरला नाही, तर अनेकांच्या आयुष्यात नव्या आशेचा, नव्या उजेडाचा दीप उजळणारा सामाजिक महोत्सव ठरला.

पाळधी :
